चंद्रपूर (प्रतिनिधी) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे दि. 17 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एल.अँड.टी करीता सुतारकाम, कारपेंटर, मेसन, इलेक्ट्रिकल, वायरमन आणि वेल्डर व्यवसायात प्रशिक्षण घेत असलेले तसेच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या 18 वर्षावरील उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मेळाव्यामध्ये मुलाखतीद्वारे प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येईल. जिल्ह्यातील वरील व्यवसाय उत्तीर्ण उमेदवारांना एल.अँड.टी बांधकाम कौशल्य प्रशिक्षण संस्था, पनवेल येथे जेवण व राहण्याच्या मोफत व्यवस्थेसह बांधकाम क्षेत्रात प्रगत प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करणाऱ्या उमेदवारास प्रोजेक्ट साइट जसे, बुलेट ट्रेन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई-न्हावा शिवा सागरी सेतू येथे काम करण्याची संधी मिळेल.
निकषप्राप्त आयटीआय उत्तीर्ण व प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना सुपरवायझर पदासाठी कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते. वरील व्यवसायात आयटीआय प्रशिक्षण घेत असलेल्या व उत्तीर्ण उमेदवारांनी मुळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह भरती मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केले आहे.