विभाश्री भेंडारे बनली आंतरराष्ट्रीय कराटे चॅंपियन

एनएसकेए आंतरराष्ट्रीय कराटे चॅंम्पियनशीप-2022 स्पर्धा

रोहित निकुरे, मूल

गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील रहिवासी विभाश्री भेंडारे हीने नेपाळ- काठमांडु येथे झालेल्या एनएसकेए आंतरराष्ट्रीय कराटे चॅंम्पियनशीप-2022 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करुन २ गोल्ड व १ सिल्व्हर मेडल मिळवून आपल्या नेत्रदीपक कामगिरीने भारताची व गडचिरोली जिल्ह्याची मान उंचाविली त्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विभाश्री ही ब्रम्हपुरी कराटे असोसिऐशनची विद्यार्थिनी असून संचालक शिआन गणेश लांजेवार सरांच्या कोचिंगमध्ये नियमित सराव करीत होती. या स्पर्धेत ७ देशासह भारताकडुन सदर असोसिऐशनच्या टीमने भाग घेतला होता. त्यात या टीमने विनर्सचे पारितोषिक मिळविले तर विभाश्रीने वैयक्तिक २ गोल्ड व १ सिल्व्हर मेडल मिळवून ब्रम्हपुरीच्या क्रिडा क्षेत्राची मान उंचाविली

.

विशेष म्हणजे विभाश्री गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील डोंगरगाव पुराडा येथील अल्का शामराव भेंडारे यांची मुलगी असून प्रा. जेंगठे यांची नात आहे. ती सध्या मिराबाई कांबळे नर्सिंग महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे शिकत असुन ज्ञानज्योती लायब्ररीमध्ये अभ्यास करीत आहे. तीला स्पोर्टमध्ये विशेष आवड असल्याने यापुर्वीसुद्धा तिने अनेक पारितोषिके मिळविली आहेत. तथापी आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढे मोठे यश मिळवेल याची कुटुंबातील लोकांना खात्री नव्हती. त्यामुळे तिच्या विजयाची बातमी ऐकुन सर्वांना सुखद धक्का बसला.
खरेतर अतिदुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातल्या मुलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर जावून यश खेचुन आणने ही असामान्य बाब आहे. परंतु जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर जगात काहीच अशक्य नाही हे विभाश्रीने दाखवून दिले. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल माईरंभा ग्रामविकास संस्था, ज्ञानज्योती लायब्ररी , रोजगार संघ व मित्रपरिवाराच्या वतीने विभाश्रीचे, टीमचे व संचालक शिआन लांजेवार सरांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.