डॉक्टर व कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीमुळे महिला रुग्णाचा मृत्यू

प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रवेशद्वार होते बंद
तालुक्यातील डोंगरगाव खडी येथील घटना

अतुल कोल्हे भद्रावती –
तालुक्यातील डोंगरगाव खडी येथील सार्वजनिक प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने उपचाराअभावी पान वडाळा येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. डॉक्टर सह एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.

तालुक्यातील पालवडाळा येथील सिंधू भावराव हनूमंते वय ५५ या महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने दोन किमी अंतरावर असलेल्या डोंगरगाव खडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आणण्यात आले. परंतु या आरोग्य केंद्राच्या प्रवेशव्दारच बंद होते व त्याला ताराने बांधून होते. ते काढून रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात आनले असता एकही कर्मचारी नव्हता तसेच डॉक्टर सुद्धा गैरहजर होते. या नंतर रुग्णाची प्रकृती बिघडल्याने तिचा तिथेच मृत्यू झाला या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली. त्यानंतर या ठिकाणी भद्रावती पोलीस सुद्धा दाखल झाले. घटनेची माहिती येथील डॉक्टर कातकर यांना माहिती होताच ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. रुग्णाची तपासणी करून रुग्ण मृत असल्याची माहिती दिली. हा सर्व प्रकार मृतकाची मुलगी कल्पना सुनील वाटेकर यांनी बघितला असून डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या प्रकारामुळे डोंगरगाव खडी व पानवडाळा येथील नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी करून येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी मृतदेह या ठिकाणी ठेवला होता. घटनास्थळी भद्रावती पोलिस दाखल झाले असून संबंधित डॉक्टर व कर्मच्याऱ्यांनवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.