अवैध गौण खनिज उत्खन करणाऱ्यांची दादागिरी आली पुढे : तक्रारकर्त्याला मारहाण


राजुरा (प्रतिनिधी) : मागील अनेक दिवसांपासुन राजुरा तालुक्यात मोठया प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन सुरू आहे, याकडे लक्ष देवुन अवैध गौण खनिज उत्खनन थांबविण्यासाठी मानवाधिकारी सहायता संघाचे तालुका उपप्रमुख अंकुश भोंगळे यांनी तहसीलदार राजुरा यांचेकडे तक्रार दिली, यावरून अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांनी तक्रार दिल्याचा राग मनात ठेवुन तक्रारकर्त्यास मारहाण केली.

राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन व रेतीचा वारेमाप उपसा सुरू आहे. यावर महसूल प्रशासनाकडून साधलेली चुप्पी संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. तालुक्यात सुरू असलेले अवैध खनिज उत्खनन थांबवून संबंधित वाहन व व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मानवाधिकार सहायता संघाचे तालुका उपप्रमुख अंकुश भोंगळे यांनी तहसीलदार राजुरा यांच्याकडे 9 मार्चला निवेदनातून केली होती. दरम्यान अंकुश भोंगळे हे 11 मार्च रोजी शेतावर जाण्यासाठी निघाला असता राजुरा येथील बस स्थानकावर तो मित्रासोबत बोलत असताना काही अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांनी तु आमची खदान बंद करतो काय, आमचा धंदा बंदर करतो काय म्हणत अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली. यावरूनच अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांची दादागिरी पुढे आली आहे.

सदर प्रकरणाची तक्रार अंकुश भोंगळे यांनी राजुरा पोलीस स्टेशन येथे केली आहे.