निळ्या पुर रेषेमध्ये लादलेल्या बंदी हटविण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे पप्पू देशमुख यांना आश्वासन

 

चंद्रपूर शहरातील गोविंदपुर, वडगाव व चांदा रयतवारी या भागातील अनेक भूखंड ब्ल्यू झोन मध्ये आलेले आहेत.
निळ्या पुर रेषेमध्ये लादलेल्या बंदी हटविण्या बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.

अडचणीत सापडलेल्या मध्यमवर्गीय लोकांना दिलासा देण्यासाठी निळ्या पूररेषेच्या आतमध्ये बांधकामावर लादलेली बंदी तातडीने हटविण्यात यावी अशी मागणी वडगाव प्रभागाचे नगरसेवक, जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

आज 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रपूर महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी नगरसेवक देशमुख यांनी मनीषा बोबडे, अक्षय येरगुडे, आकाश लोडे, अमोल घोडमारे, गितेश शेंडे यांच्या शिष्टमंडळासह भेटून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निळ्या पुर रेषेमध्ये बांधकामावर लादलेली बंदी मागे घेणेबाबत निवेदन दिले.

जलसंपदा मंत्रालय अंतर्गत कार्यरत पाटबंधारे विभागाने निळ्या व लाल पुर रेषेची आखणी केली. मात्र, शहरातील ज्या भागांमध्ये अनेक वर्षापासून कधीही पूर आलेला नाही, अशीही अनेक घरे किंवा भूखंड निळ्या व लाल रेषेच्या आत आलेले आहेत. तसेच इरई नदीपर्यंत आतापर्यंत महसूल विभागाने जमिनी अकृषक करण्याची मंजुरी दिली व नगरपालिका किंवा महानगरपालिकेने शेकडो भूखंडावर बांधकामाच्या परवानग्या सुद्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय लोकांनी वडगाव, नगीनाबाग परिसरात भूखंड घेऊन घर तयार करण्याची स्वप्ने बघितली. मात्र पाटबंधारे विभागाने दोन वर्षांपूर्वी आखलेल्या निळ्या व लाल पुर रेषेमुळे अशा हजारो भूखंड धारकांचे घर तयार करण्याचे स्वप्न अडचणीत आलेले आहे, असे पप्पू देशमुख यांनी सांगितले.