विहिरीत कुजलेल्या अवस्थेत बिबटयासह तीन रानडुक्कर आढळले

घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी उपस्थित

गोंदिया (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात वाघाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता तिरोडा तालुक्यात बिबट्यासह तीन रानडुकरांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह विहिरीत सापडल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. तिरोडा तालुक्यातील तिरोडा वनक्षेत्रातील पिंडकेपार अर्जुनी, बीट गोंडराणी येथील विहिरीत शनिवारी एक बिबट्या व तीन रानडुकरांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाले.

तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही खासगी शेतातील व वापरात नसलेली, अर्धवट बुजलेली विहीर होती. या विहिरीच्या आसपास जंगल नाही. सुरुवातीला वीजप्रवाह सोडून केलेल्या शिकारीचा तर प्रकार नाही ना, अशीही शंका व्यक्त करण्यात आली. विहिरीत आडवे खांब असल्याने अर्धवट कुजलेल्या चारही मृतदेहावर जखमा होत्या.

उपवनसंरक्षक कुलराज सिंग, साहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी आकरे, मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर, मुकुंद धुर्वे यांनी घटनास्थळी पाहणी केली. शवविच्छेदनानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.