व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी राज्य अधिवेशनात विविध ठराव मंजूर ठराव
शिर्डी/ प्रतिनिधी : पत्रकारांसाठी शासनाने जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा, दहा वर्ष पुर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती कार्ड व पत्रकार म्हणून प्रमाणपत्र द्यावे यासह विविध मागण्यांचे ठराव व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशनात मांडण्यात आले. हे सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
देशातील क्रमांक एक ची आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी दि. 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी येथे पार पडले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची विशेष सभा झाली. यावेळी राज्य अध्यक्ष अनिल मस्के, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर आदी उपस्थित होते.
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया च्या माध्यमातून शासन दरबारी सतत पाठपुरावा सुरू आहे. यासाठी संघटनेने अनेक आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. व्हॉईस ऑफ मीडिया च्या आंदोलनाची दखल घेत शासनाने पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र अद्याप हे महामंडळ कार्यान्वित केलेले नाही. शासनाने तातडीने हे महामंडळ स्थापन करून ते कार्यान्वित करावे व या महामंडळास 200 कोटी रुपये द्यावे असा ठराव यावेळी करण्यात आला.
यासह दहा वर्ष पत्रकारिता करणाऱ्यां पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती कार्ड व पत्रकार म्हणून प्रमाणपत्र द्यावे, दहा वर्ष काम करणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांना आरोग्य विमा, विना मूल्य उपचार उपलब्ध करून द्यावेत, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षिनिक संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी कोठा ठरवण्यात यावा, प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार गृहनिर्माण वसाहत निर्माण करावी, पत्रकार संशोधन केंद्र स्थापन करावे, दैनिक व साप्ताहिक यांना देण्यात येणाऱ्या जाहिरातीचे समान धोरण ठरवावे, शासनाने पत्रकार सन्मान योजना राबवावी ज्येष्ठ पत्रकारांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे आदी मागण्यांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. सदरचे ठराव शासनाला सादर करण्यात येणार असून अंमलबजावणी साठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. ठराव वाचन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी केले.
अधिवेशनातील विविध ठराव..
* पत्रकारांसाठी जाहीर केलेले स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे
* १० वर्ष पूर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्विकृती कार्ड व पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे
* दहा वर्ष पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबाला आरोग्य विमा व विनामूल्य उपचार उपलब्ध करून द्यावेत
* पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोटा ठरविण्यात यावा
* प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार गृहनिर्माण वसाहत निर्माण करावे
* शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार संशोधन केंद्राला मान्यता घ्यावी
* शासनाद्वारे दैनिक आणि साप्ताहिकांना देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे समान धोरण ठरविण्यात यावे
* शासन स्तरावर पत्रकार सन्मान योजना राबविण्यात येऊन जेष्ठ पत्रकारांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावेत