धानोरकर गटाचा दारून पराभव
मूल (प्रतिनिधी) : सहकार क्षेत्रासाठी महत्वाची समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीचा निकाल आज शनिवारी प्रशासकीय भवन येथे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यानी जाहिर केला असुन यानिकालावरून कॉंग्रेसच्या रावत गटाने खासदार धानोरकर गटाचा दारूण पराभव केला आहे. Rawat group of Congress defeated the MP Dhanorkar group
मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालकापैकी हमाल तोलारी मतदार संघात रमेश बरडे अविरोध निर्वाचित झाल्याने काल सतरा संचालक पदांसाठी गुप्त मतदान पार पडले. अकरा संचालक निवडुन दयावयाच्या सेवा सहकारी संस्था मतदार संघात सतरा उमेदवारांनी नशीब अजमावले. या मतदार संघाच्या सर्वसाधारण गटात कॉंग्रेसच्या रावत गटाचे बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावार यांचेसह माजी उपसभापती सुनिल गुज्जनवार, माजी संचालक राजेंद्र कन्नमवार, अखील गांगरेड्डीवार, किशोर घडसे, हसन वाढई यांनी पुन्हा संचालक पदाची खुर्ची बळकावली आहे. या गटात खासदार समर्थक गटाचे किरण पोरेड्डीवार, सुधाकर बांबोळे आणि पराग वाढई यांना पराभव स्विकारावा लागला. सेवा सहकारी संस्थेच्या महिला राखीव गटात कॉंग्रेसच्या रावत गटाच्या चंदा कामडी आणि उषा शेरकी विजयी झाल्या, खासदार समर्थक गटाच्या वनिता हरडे पराभुत झाल्या, इमाव गटातून कॉंग्रेसच्या रावत गटाचे सुमीत आरेकर यांनी खासदार समर्थक गटाचे नरेंद्र चौधरी यांचा पराभव केला तर विजाभज राखीव गटात बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप कारमवार यांनी खासदार समर्थक गटाचे पंकज पुल्लावार यांना पराभवाची धुळ चारली.
चार संचालक निवडून दयावयाच्या ग्राम पंचायत मतदार संघात दोन संचालक निवडून दयावयाच्या सर्वसाधारण गटात कॉंग्रेसच्या रावत गटाचे राहुल मुरकुटे आणि लहुजी कडस्कर यांनी बाजी मारली असून त्यांनी खासदार समर्थक गटाचे राकेश दहीकर आणि भाजप विचाराचे स्वतंत्र उमेदवार रंजीत समर्थ यांचा पराभव केला. अनुसूचित जाती जमाती गटातून रावत गटाच्या शेतकरी विकास आघाडीचे शालीक दहीवले यांनी खासदार समर्थक गटाचे अरविंद वनकर आणि भाजप विचाराचे स्वतंत्र उमेदवार प्रशांत बांबोळे यांचा पराभव केला. आर्थिक दृष्टया दुर्बल गटातून कॉंग्रेसच्या रावत गटाचे जालींदर बांगरे यांनी खासदार समर्थक गटाचे भुपेश दुर्गे यांना पराभवाची धुळ चारली. दोन संचालक निवडून दयावयाच्या व्यापारी अडते मतदार संघात तुलाराम घोगरे या अडत्याने तर अमोल बच्चुवार हे व्यापारी विजयी झाले आहे. या गटात कासु वेंकन्ना साईलु आणि सुधाकर मोहुर्ले पराभूत झाले. या गटात कॉंग्रेसच्या रावत गटाच्या शेतकरी विकास आघाडीने अडते तुलाराम घोगरे आणि सुधाकर मोहुर्ले यांना पाठींबा दिला होता. अठरा संचालकीय मूल कृषी उत्पन्न बाजार समिती मध्यें कॉंग्रेसच्या विजय वडेट्टीवार व संतोष रावत गटाने सोळा जागेवर विजय मिळवत समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. परंतु विजयोत्सव साजरा करतांना व्यापारी मतदार संघातुन विजयी झालेले अमोल बच्चुवार आणि हमाल तोलारी संघातुन अविरोध निर्वाचित झालेले रमेश बरडे हे दोन्ही संचालक काँग्रेसच्या रावत गटात सहभागी झाले होते. पार पडलेली बाजार समितीची निवडणुक भाजप विरूध्द कॉंग्रेस अशी रंगेल अशी चर्चा होती. परंतू ऐनवेळेवर भाजपा समर्थक उमेदवारांनी निवडणुक रिंगणातून माघार घेतल्याने पार पडलेली निवडणुक कॉंग्रेस विरूध्द काँग्रेस अशी झाली.
समितीवर वर्चस्व प्रस्थापीत केलेल्या कॉंग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीने यावर्षी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शनात आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे नेतृत्वात गड लढविला हे विशेष.