चंद्रपूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या पदास केंद्रीय गृहमंत्रालय द्वारे जारी पत्राद्वारे कॅबिनेट मंत्रीपदाचा समकक्ष दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून महामहिम राष्ट्रपतींनी दि 02 डिसेंबर 2022 रोजी त्यांची या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. आता या पदास केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा लागू करण्यात आला आहे. Hansraj Ahir, Chairman, National Commission for Backward Classes
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हंसराज अहीर यांनी देशातील विविध राज्यातील ओबीसी प्रवर्गातील शासकीय, निमशासकीय, उद्योग, विविध कंपन्या, कोळसा खाण क्षेत्रातील ओबीसी अधिकारी, कर्मचारी, कामगारांचा अनुशेष, रोष्टरनुसार भरण्याकरीता सुनावणीद्वारा आढावा घेतांनाच ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक व रोजगार विषयक प्रश्नांबाबत अत्यंत जागरुकतेेने कार्य करीत आहे. ओबीसींच्या संवैधानिक अधिकारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने ते प्रभावीपणे कार्यरत आहेत.
हंसराज अहीर यांनी यापूर्वी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे 4 वेळा प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, खासदारकीच्या कार्यकाळात कोल व स्टील सह अन्य संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदावर उल्लेखनीय कार्य केले आहे. 16 व्या लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री तसेच उर्वरक व रसायन मंत्री या पदांचे निर्वहन सुध्दा त्यांनी प्रभावीपणे केले आहे.
कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल झाल्याबद्दल हंसराज अहीर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.