कॉंग्रेसचे नविन तालुकाध्यक्ष जाहिर
मूल (प्रतिनिधी) : काही दिवसावर येवुन ठेपलेल्या ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर पालीका निवडणुकाच्या तोंडावर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्षपद जाहिर झाले असुन मूल येथील जेष्ठ पत्रकार गुरूदास गुरूनुले यांची यापदावर नेमणुक झालेली आहे, तर मागील अनेक वर्षापासुन मूल तालुका भाजपाच्या अध्यक्षपदाची सुत्रे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरूनुले यांच्याकडे आहे. मूल तालुक्यात आता काकु-पुतण्याकडे कॉंग्रेस आणि भाजपाचे महत्वाचे पद असल्याने भविष्यात होणाऱ्या निवडणुकीकडे आता काकु-पुतणे कशापध्दतीने राजकीय डाव खेळतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.
राजकीयदृष्टया संवेदनशिल असलेला मूल तालुका हा भाजपाचा गड मानला जातो, क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगटीवार हे राज्याचे अभ्यासु कॅबीनेट मंत्री म्हणुन परिचीत आहे. त्यांच्या नेतृत्वात मूल तालुक्याचा न भुतो न भविष्यती असा विकास झालेला असुन त्यांच्या मुळेच मूल शहराला स्मार्ट सिटी म्हणुन ओळखल्या जातो. नामदार मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासुन मूल तालुका भाजपाच्या अध्यक्ष म्हणुन संध्याताई गुरूनुले कार्यरत आहे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अनेक विकासात्मक कामे त्यांच्याही हातुन पुर्ण झालेले आहे. मात्र तालुक्यातील ताडाळा, टोलेवाही आणि भगवानपूर ग्राम पंचायतच्या निवडणुकीत ताडाळा आणि टोलेवाही ग्राम पंचायतच्या सरपंच पद गमवावे लागले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य भाजपाचेच राहुनही पराभव का पत्करावा लागला हा संशोधनाचा विषय भाजपासाठी आहे. दरम्यान मूल तालुक्यातील 7 ग्राम पंचायतची निवडणुक येत्या काही दिवसावर होणार आहे तर डिसेंबर आणि जानेवारी मध्ये नगर पालीका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक होणार आहे.
निवडणुकीचा झंझावाताला सुरूवात होण्यापुर्वीच प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस (प्रशासन व संघटन) प्रमोद मोरे यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या मूल तालुकाध्यक्षपदी गुरूदास गुरूनुले यांनी नियुक्ती केली असुन त्यानियुक्तीला कॉंग्रेसचे प्रदेश निवडणुक अधिकारी पालम राजु यांनी मान्यता दिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली नेमणुक काकु-पुतण्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची ठरणार आहे, यामध्ये नेमके कोणाचे पारडे जड राहणार हे मात्र निवडणुकीवरून स्पष्ट होणार आहे.
गुरूदास गुरूनुले यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन
मूल येथील जेष्ठ पत्रकार आणि विविध सामाजिक संस्थेचे प्रतिनिधीत्व करीत असलेले गुरूदास गुरूनुले यांची मूल तालुका कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.