जि. प. हायस्कूल बंदला मिळाली स्थगिती : विसापूर ग्रामपंचायतीने केले मोर्च्याचे आयोजन
चंद्रपूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून सर्व साधारण सभेच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला. ही शाळा बंद होऊ नये म्हणून विसापूर ग्रामपंचायतीने आज सोमवारी शिक्षक दिनाच्या दिवशी जणआक्रोश मोर्च्याचे आयोजन केले. चंद्रपूर येथील पटेल हायस्कूल पासून जिल्हा परिषद कार्यालयावर जणआक्रोश मोर्चा धडकला. विसापूरकरांच्या जणआक्रोश मोर्च्याला यश येऊन जिल्हा परिषद प्रशासनाने विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल बंदला स्थगिती दिल्याचे पत्र ग्रामपंचायत शिष्टमंडळाला दिले.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये वर्ग ५ ते १० पर्यंत जिल्हा परिषद हायस्कूल सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही व शाळेतील पटसंख्या कमी आहे. हे कारण जिल्हा परिषद प्रशासनाने दिले. यासंदर्भात विसापूर ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल बंद होऊ नये. म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) जि. प. चंद्रपूर, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांना निवेदन सादर करून विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल बंद होऊ नये, म्हणून विनंती केली. अर्ध्यापेक्षा अधिक शैक्षणिक सत्र झाल्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा म्हणून प्रयत्न केला. मात्र यावर जिल्हा परिषद प्रशासन शाळा बंद करून तेथील कार्यरत शिक्षकांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करून आपला मार्ग सुकर करन्याच्या मानसिकतेत होती. यावर प्रतिबंध मिळावा. यासाठी विसापूर ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद कार्यालयावर जणआक्रोश मोर्चा सोमवारी काढला.
जिल्हा परिषद हायस्कूल नाही कुणाच्या बापाची, जिल्हा परिषद हायस्कूल आमच्या हक्काची. विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल कायम सुरु राहिली पाहिजे, अशी घोषणाबाजी करून जणआक्रोश मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. विसापूरकरांचा जणआक्रोश मोर्चा चंद्रपूर पटेल हायस्कूल चौकातून निघाला. गांधी चौक मार्ग जटापुरा गेट पासून जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला.
यावेळी मोर्च्यात विसापूर ग्रामपंचायतीचे सरपंच वर्षा कुळमेथे,उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गेडाम, दिलदार जयकर, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, वैशाली पुणेकर, हर्षला टोंगे,सुरज टोमटे, सुरेखा इटणकर, विद्या देवाळकर, सरोज केकती, संदीप काकडे, सुनील रोंगे, गजानन पाटणकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या सह शेकडो गावाकऱ्यांनी जणआक्रोश मोर्च्यात सहभाग घेतला.
जिल्हा परिषद कार्यालयात आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून गौरव समारंभ आयोजित केला होता. मोर्चेकऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली. मात्र पोलीस प्रशासनाने मोर्चा कार्यालयाच्या पटांगणावर अडविला.दरम्यान पोलिसांनी निवडक शिष्टमंडळाला निवेदन सादर करण्यासाठी आत सोडले. मात्र बराच वेळ होऊनही अधिकारी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारण्यास आले नाही. यामुळे शिष्टमंडळ संतप्त झाले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृहाच्या समोर बैठा सत्याग्रह केला. याची माहिती कार्यक्रमाला उपस्थित चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांना मिळाली. त्यांनी लगेच मोर्चेकऱ्यांची समजूत घालून शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांना पाचरण करून निवेदन स्वीकारण्यास भाग पाडले. शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल बंदला स्थगिती दिल्याचे गावाकऱ्याकडे पुढे सांगितले. तो आदेश शिक्षणाधिकारी यांनी उपसरपंच अनेकश्वर मेश्राम व ग्रामपंचायत लिपिक संतोष निपुंगे यांच्याकडे दिला. त्याचे वाचन ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गेडाम यांनी जनतेपुढे करून जलोष साजरा केला.