वाघांचा बंदोबस्त लवकरात लवकर करा : तालुका काँग्रेसची मागणी

वनविभागाला निवेदन सुपुर्द

सुधाकर दुधे, सावली
तालुक्यात वाघांची दहशत दिवसेंदिवस वाढत जात आहे. सावली तालुक्यातील अनेक गावात वाघाच्या हल्ल्यात नागरिक मृत पावले आहेत. जवळपास चार ते पाच वाघ परिसरात फिरत आहेत. नुकतेच हिरापूर येथील नागरिक श्री भक्तदास झरकर यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झाला होता. त्यामुळे वाघाचा पिंजरा लावून बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सावली तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नितीनजी गोहणे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी वि. ए. राजूरकर यांना दिलेल्या निवेदनातुन केलेली आहे.

सावली तालुक्यात घनदाट जंगल असून झुडपी जंगल मोठ्या प्रमाणात आहे. वाघाच्या भीतीने शेतकरी शेताकडे जाण्यास सुद्धा घाबरत आहेत. हिरापूर परिसरात गावाशेजारी वाघाचे येणे जाणे सुरू असते. हिरापूर येथील काही दिवसांपूर्वी बिबट्याने घरात शिरून जयंत गोहणे यांच्या शेळ्या फस्त केल्या होत्या. वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे वाघाच्या बंदोबस्तासाठी जागच्या जागी पिंजरे लावणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यासोबतच सावली तालुक्यातील जंगली जनावरमुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रानडुक्कर, चिता, हरीण, यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे रोवलेले धान नष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रानडुक्कर, चिता, हरिण यांचा बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी निवेदनातुन करण्यात आलेली आहे.

सावली तालुक्यातील बहुतांश वर्ग हा शेतीवर जीवन जगतो. अश्या परिस्थितीत जंगली जनावरांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे जीवन जगणे कठीण होईल. त्यामुळे हिंस्त्र वन्यजीव पशूंचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नितीनजी गोहणे यांनी निवेदनातुन केली आहे.

सदर निवेदन देतांना सौ लता लाकडे नगराध्यक्षा नगर पंचायत सावली, सौ प्रीती गोहणे सरपंच ग्राम पंचायत हिरापूर, शरद कन्नाके उपसरपंच, सौ नीता मुनघाटे सदस्या ग्राम पंचायत, यशोदा देशमुख अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती, प्रमोद भोपये सदस्य ग्राम पंचायत, सुनील देशमुख, विनोद भोपये, किशोर आत्राम, केशरी मुनघाटे उपस्थित होते.