भिषण अपघातात 4 जागीच ठार: अपघातात पती पत्नीचा समावेश
सुधाकर दुधे, सावली
चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर उभ्या ठªकला बोलेरोनी दिलेल्या धडकेत 4 जण जागीच ठार झाले असून एक जण जखमी आहे. किसान नगर जवळ गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात उभ्या ट्रकला बोलेरो वाहनाने जबर धडक दिल्याने हा अपघात रात्रीच्या सुमारास घडला. ठार झालेले प्रवासी हे बोलेरो मधील आहेत.
गडचिरोली येथील पंकज बागडे हे सावली तालुक्यातील विहीरगाव येथे त्यांचे मित्र अनुप ताडूलवार याचेकडे चंद्रपूर येथे डिजेचे काही साहित्य खरेदी साठी बोलेरो वाहन क्रमांक एम एच 33 ए 5157 ने गेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत मित्र अनुपची पत्नी व साळा सोबतीला होते.
चंद्रपूर येथून साहीत्य खरेदी करून गावाकडे परत येत असताना चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली तालुक्यातील किसानगर येथे भिषण अपघात झाला. मुख्यमार्गावर गाय बसलेली असताना तिला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना वाहनाचे स्टेरिंग राळ तुटल्याने महामार्गावर उभ्या ट्रकला वाहनाची जबर धडक बसली. या भिषण अपघातात जागीच चार जण ठार झाले. यामध्ये पंकज किशोर बागडे ( वय 26) रा.गडचिरोली, अनुप रमेश ताडूलवार (वय 35) रा.विहीरगाव ता. सावली, महेश्ववरी अनुप ताडूलवार (वय 24) रा. विहीरगाव, ,मनोज अजय तीर्थगिरीवार (वय 29) रा. ताडगाव ता. भामरागड जिल्हा गडचिरोली यांचा मृत्यू झाला. सुरेंद्र हरेंद्र मसराम (वय 23) रा. चिखली ता. सावली जिल्हा चंद्रपूर हा जखमी झाला आहे.
अपघात एवढा भिषण होता की बोलेरोची ट्रकला जबर धडक झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामूळे किसाननगर व व्याहाड खूर्द येथील नागरिक धावून आले. त्यानंतर सावली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून स्थानिकांच्या मदतीने अपघातातील मृतांना व जखमीला बाहेर काढले. मृतकांना व जखमीला सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.