पुन्हा एकदा माना – चारवट मार्ग बंद

वर्धा, इरईच्या पुराने चौथ्यांदा फटका : गावाकऱ्यांचा जीव लागला टांगणीला

अनेकेश्वर मेश्राम, बल्लारपूर
बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती व चारवट वर्धा व इरई नदीचा प्रकोप आला आहे. नदीचा जलस्तर वाढल्याने गावाकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. वर्धा व इरई नदीच्या पुराने माना – चारवट दरम्यान पुलावर पाच ते सहा फूट पाणी आल्याने मार्ग बंद झाला. मागील २० दिवसात चौथ्यांदा बुधवारी गावाचा सपंर्क तुटल्याने गावकरी हैरान झाले आहे.

बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती व चारवट गाव शेवटच्या टोकावर आहे. येथील गावाकऱ्यांचा दररोज चंद्रपूर शहराशी संबंध येतो. येथील शेतकऱ्यांना भाजीपाला व दूध विक्रीसाठी शहरात जावे लागते. मात्र मागील २० दिवसात पुराने गावाकऱ्यांची दैना केली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता दरम्यान इरई नदीचा जलस्तर वाढल्याने व पूल पुराच्या पाण्याखाली आल्याने अवागमन करणारा एकमेव मार्ग बंद झाला.

हडस्ती व चारवट गावात मुख्य व्यवसाय शेती आहे. वर्धा व इरई नदीच्या चौथ्यांदा आलेल्या पुराने शेतीची पूर्ण वाट लागली आहे. अशातच दुग्ध व्यवसाय देखील सततच्या पुराने मोडकळीस आल्याने शेतकरी वैतागून गेला आहे.