चंद्रपूर जिल्हा परिषदेसाठी २८ जुलैला आरक्षण सोडत

ओबीसी आरक्षणासह निघणार सोडत : जिल्हा परिषदेचे ६२ गट व पंचायत समितीचे १२४ गणासाठी काढणार आरक्षण

अनेकेश्वर मेश्राम, बल्लारपूर
राज्य निवडणूक आयोगाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पाडण्यासाठी हालचाल सुरु केली. आता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण सोडत २८ जुलैला काढली जाणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे ६२ गट व १५ पंचायत समितीचे १२४ गणासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

यापूर्वी १३ जुलै रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढली जाणार होती. मात्र नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी ) आरक्षणाचा समावेश नव्हता. परिणामी राज्य निवडणूक आयोगाने त्यावेळी आरक्षण सोडतीला स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर व दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिल्याने निवडणूक आयोग सक्रिय झाले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद ६२ गटासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तर १५ पंचायत समितीच्या १२४ गणासाठी तहसील कार्यालयात २८ जुलैला आरक्षित जागेसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.या आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी )व सर्वसाधारण महिला जागा गट व गणासाठी राखीव केल्या जाणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच जिल्हा परिषदेच्या ६२ गटाला व १५ पंचायत समितीच्या १२४ गणाला मान्यता दिली असून गट व गणांची रचना केली आहे.

ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर शिक्कामोर्तब झाल्याने ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केल्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय ऐन पावसाळ्यात तापायला लागले आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारी करिता मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. कोणता गट, कोणता गण, कोणासाठी आरक्षित होणार, म्हणून अनेकांची धाकधूक वाढली आहे.

२९ जुलै ते २ आगस्ट दरम्यान आक्षेप व हरकती स्वीकारणार
राज्य निवडणूक आयोगाच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानंतर २९ जुलैला जिल्हाधिकारी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची आरक्षण प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करतील. जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गण आरक्षण निश्चित झाल्यावर काही हरकती व आक्षेप असल्यास त्या बाबत नागरिकांना २९ जुलै ते २ आगस्ट दरम्यान दाखल करण्याची मुद्दत दिली आहे. त्यानंतर ५ आगस्टला हरकती व आक्षेप निकाली काढून जिल्हाधिकारी राजपत्रात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण आरक्षणाला अंतिम रूप देतील.

८ आगस्टला मतदान केंद्र निहाय मतदार यादी होणार प्रसिद्ध
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा परिषद गटासाठी विधानसभा मतदार यादीवरून मागील मंगळवारी पारूप मतदार यादी जाहीर केली आहे. या पारूप मतदार यादीवर सोमवार दि.२५ जुलै पर्यंत आक्षेप व हरकती नागरिकांना दाखल करता येणार आहे. त्यानंतर २९ जुलैला निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार यादी अधीप्रामाणित करून प्रसिद्ध केली जाणार आहे. येत्या ८ आगस्टला मतदान केंद्र व मतदान केंद्र निहाय मतदार यादी अंतिम स्वरूपात प्रसिद्ध केली जाणार आहे.