दररोज शेकडो बसेसच्या फेऱ्या
✍️ नुतन गोवर्धन, मूल : व्यावसायीक दृष्टया प्रगत असलेल्या मूल शहरात बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र त्या तुलनेत एसटी बसेसच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशाना वेळेत एसटी बस मिळण्यासाठी मूल येथे एसटी महामंडळाचे आगार देण्याची मागणी नागरीक करीत आहे.
एस टी महामडंळाला वर्षाकाठी लाखो रुपयाचे उत्पन्न देणाऱ्या मूल बसस्थानकावरून एसटी बसेसच्या दररोज शेकडो फेऱ्या होत असतात. मूल येथे धानाची मोठी बाजार पेठ असुन तालूक्याचे ठिकाण आहे. मूल शहरात न्यायालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालये, उपजिल्हा रुग्णालय, उपअधिक्षक तालुका भूमी अभिलेख कार्यालय तसेच इतरही सरकारी कार्यालये आहेत. त्यानिमीत्याने शासकीय कामासाठी तालुक्यातील ग्रामिण भागातुन शेकडो नागरीक आणि विद्यार्थ्यी दररोज मूल मध्ये येत असतात. आपले काम आटोपुन गावाला परत जाण्यासाठी येथील बसस्थानकावर आल्यावर त्याना मात्र तासनतास बसची वाट पाहत ताटकळत रहावे लागते.
मूल शहराच्या मध्यभागी मोठे बसस्थानक असले तरी येथे येणाऱ्या बसेस ह्या गडचिरोली, चंद्रपूर आणि ब्रम्हपूरी येथील आगारातून येतात. त्यामुळे बस फेऱ्याचे नियोजन त्या-त्या आगारातून होत असते. परंतु बसफेऱ्या नियमीत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. प्रवाशाना त्यांचा वेळेत बस मिळणे आवश्यक आहे. मात्र येथील बसस्थानक बसेस साठी दुसऱ्या आगारावर अवलबुंन असते. त्यामुळे प्रवाशाना त्यांच्या वेळेत बस उपलब्ध करुन देण्यात अडचणी येत असल्याचे येथील वाहतुक नियंत्रकाचे म्हणणे आहे.
प्रवाशांच्या बसेसची अडचण लक्षात घेता मूल येथे एसटीचे आगार होणे आवश्यक आहे. आगार झाल्यास प्रवाशांच्या संख्येनुसार त्या-त्या मार्गावर बसेस सोडण्याची व्यवस्था करता येऊ शकेल. एसटी महामंडळाने आगारासाठी मूल येथे यापुर्वीच सात एकर जागा घेऊन ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाकडुन आगारासंबधी कोणतेही निर्देष न मिळाल्याने येथे आगार होऊ शकले नाही. मात्र आता मूल येथे आगार होणे काळाची गरज झाली आहे.