२६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत झाली पास
वरोरा {प्रतिनिधी}: दिव्यांगांचे सक्षमीकरण करताना व्यावसायिक प्रशिक्षणासोबतच त्यांचा औपचारिक शिक्षण प्रवाह देखील मुख्य प्रवाहात अखंडित पणे सुरु रहावा, या हेतूने मागील ५ दशकांपासून महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित निजबल अंतर्गत संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा, आनंदवन कार्यरत आहे. अंध, कर्णबधिर व अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना बोर्डाच्या खाजगी परीक्षा योजने अंतर्गत (१७ नंबर फॉर्म द्वारे) मागील २९ वर्षांपासून एस. एस. सी.चे शिक्षण येथे विनामुल्य दिले जाते. यावर्षी १६ कर्णबधिर आणि ११ अंध असे एकूण २७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी १० वी च्या परीक्षेत उत्तम यश संपादित करीत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
सदर परिक्षेतील निकालामध्ये २६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाली आहेत. आयुष चेनुरवार या कर्णबधिर विद्यार्थिनीने ७७ टक्के गुण मिळवीत तर पियूष राखडे या अंध विद्यार्थ्याने ७५ टक्के मिळवीत प्रवर्गात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पालकांचे पूर्ण संमतीने परीक्षा पूर्व तयारी करिता मार्गदर्शन वर्ग घेण्याचे आनंदवनाने ठरविले. कोरोना नियमांचे पालन करीत, लसीकरण करून, वसतिगृहात राहून या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण मेहनतीने अभ्यास करून परीक्षा दिल्या. विशेष म्हणजे अंध विद्यार्थ्यांचे लेखनिक म्हणून आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन येथील इयत्ता नववी तर लोकमान्य विद्यालय, वरोरा येथील सहावीच्या विद्यार्थ्यांनी योगदान दिले.
केवळ ३ महिने कालावधीत राबविलेल्या सदर उपक्रमात कर्मशाळा अधीक्षक रवींद्र नलगिंटवार, समन्वयक गणेश जायनाकर, इक्राम पटेल, विजय भसारकर, उमेश घुलक्से, अश्विनी आंधळकर, रमेश बोपचे, प्रवीण ताठे, आशिष थेटे, प्रशांत गवई या शिक्षकांसह लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक कावलकर, बंडावार,, राखे, बागेसर, नवले, भोयर अडोने, गिद्देवार, वाघे, मोगरे, भोयर मॅडम आदीसह अनेकांनी सहकार्य केले.
सदर यशाकरीता संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, संस्था कार्यवाह कौस्तूभ आमटे, सौ. पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू, सदाशिव ताजने ,माधव कवीश्वर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचाली करिता दिल्या आहेत…!