ग्राम स्वच्छतेसाठी जानाळाच्या महिला सरसावल्या

वटपोर्णिमेला वृक्ष लावगड करून केला स्वच्छतेचा शुभारंभ

मूल (प्रतिनिधी) : गाव स्वच्छतेसाठी गावोगावी स्वच्छता अभियान राबविल्या जात असतानाच मूल तालुक्यातील जानाळा येथे वटपोर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर ग्राम स्वच्छता करून वृक्ष लागवड करण्यात आली असुन भविष्यात ग्राम स्वच्छता स्पर्धेत गाव सहभागी करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेत सरसावल्या आहेत.

मूल तालुक्यातील चंद्रपूर गार्गावरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या जानाळा येथे 7 सदस्यीय ग्राम पंचायत आहे, जानाळाचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य बापुजी मडावी, माजी सरपंच मनोज जांभुळे, ग्राम पंचायत सदस्य शालु कुमारे, माजी सदस्य विनायक निकोडे, तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष मंजुबाई नैताम, वनसमितीचे माजी अध्यक्ष राजु कुळमेथे, सामाजिक कार्यकर्ते अर्पित आलाम, राजेंद्र वेट्ठी यासह गावातील महिला बचत गटाच्या महिला व गावकरी मोठय संख्येने उपस्थित राहुन गाव स्वच्छतेसाठी हातात झाडु पकडुन गाव स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.

ग्राम स्वच्छतेसाठी दरवर्षी शासनामार्फत वेगवेगळया स्पर्धा राबविल्या जात आहेत, मूल तालुक्यातील राजगड या गावाने राज्यात ग्राम स्वच्छ स्पर्धेत पहिला क्रमाक पटकावुन राज्यात राजगडचे नांव कोरले आहे, तालुक्यातील कोसंबी ग्राम पंचायतनेही ग्राम स्वच्छतेसाठी पुढाकार घेवुन जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावुन विभागात जाण्याचा मान मिळविला आहे. असे असतानाही काही गावे अजुनही स्पर्धेकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. जानाळा येथील महिलानी ग्राम स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला असतानाही काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडुन विरोध केला जात असल्याचे बोलले जात असतानाही महिला आणि नागरीकांनी ग्राम स्वच्छतेसाठी पुढाकार घेवुन हातात झाडु पकडण्याचा निर्धार केला आहे.