मासिक पाळी स्वच्छता दिनाचे औचित्य साधत महिला आरोग्यासाठी ग्रामविकास विभागाचे मोठे पाऊल
मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी स्थापन झालेले सरकार आहे. ग्राम विकास विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयातून पुन्हा एकदा त्याची पावती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ना. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामविकास विभागाची यशस्वी कामगिरी सुरू आहे. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून ग्रामविकास विभागाने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काल एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
राज्यातील ६० लाखांहून अधिक महिलांना प्रत्येक महिन्याला एक रुपयात दहा सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. दारिद्र्यरेषेखालील सर्व युवती व महिला तसेच बचत गटातील महिलांसाठी ही योजना आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात शक्ती कायदा तयार करण्यात आला. आता महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही सरकारची सतर्कता दिसून आली आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी काम करत आहे. याआधीदेखील नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली होती. तसेच वाढत्या इंधन दरवाढीतून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील सीएनजीवरील १३.५ टक्के व्हॅट ३ टक्के इतका कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
ग्रामविकास विभागाकडून घेण्यात आलेला नवीन निर्णय हा महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १५ ऑगस्टपासून होणार आहे. यासोबतच सॅनिटरी नॅपकिनच्या वापरानंतर त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थादेखील ग्रामविकास विभागाकडून करण्यात येणार आहे. प्रत्येक गाव स्तरावर सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणारे मशीन बसवण्यात येणार आहे. यासाठी महिलांमध्ये जागरुकता कार्यक्रम राबविण्यात येतील.