तालुकाध्यक्ष, बी. आर. ओ कार्यकर्त्यांची बैठक
चंद्रपूर (प्रतिनिधी) : पक्ष मजबूत असल्याशिवाय मतदारांचे परिवर्तन होत नाही. महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेसच्या खासदार चंद्रपूरातून निवडून आला, हा कार्यकर्त्यांच्या विजय आहे. चंद्रपूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आगामी काळात काँग्रेसची सत्ता येणारच त्याकरिता पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी जोमाने काम करा असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. आज (शनिवारी) चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष व बी. आर. ओ कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा निवडणूक अधिकारी (डी. आर. ओ ) संजय पासवान, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर, काँग्रेस प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, इंटक नेते के. के. सिंग तसेच तालुकाध्यक्ष व बी. आर. ओ कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी चंद्रपूर ग्रामीण येथे पलाश बोढे, बल्लारपूर शहर येथे तेजराज बोढे, बल्लारपूर ग्रामीण येथे निखिल देठे, राजुरा येथे आरिज बेग, कोरपना येथे विष्णू राठोड, गोंडपिपरी येथे बिसेन सिंग, पोंभुर्णा येथे जितेंद्र कोनघारेकर, भद्रावती येथे रमण डोहे, वरोरा येथे शंकर मडावी, चिमूर येथे प्रमोद वासेकर, सिंदेवाही येथे आशिष कुलसंगे, ब्रम्हपुरी येथे मारोती गौरकर, मूल येथे अमर पाटील चालबर्डीकर, सावली येथे रवी बोरीले, जिवती येथे मनोज भोयर, नागभीड येथे प्रकाश वासू यांची बी. आर. ओ पदाची जबाबदारी दिली असून त्यांना पक्षसंघटना अधिक मजबूत कार्यासाठी आगामी काळात कार्यक्रम लावण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहे.
संजय पासवान म्हणाले कि, या जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे बघून अतिशय आनंद होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील काँग्रेसचा झेंडा रोवला जाईल त्यादृष्टीने संघटन मजबूत करण्याचे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आमदार सुभाष धोटे म्हणाले की, पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन केले असून सर्वांना विश्वासात घेऊन सुचारू प्रमाणे निवडणूक पार पडतील. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नेते एकजुटीने काम करतील. अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, काँग्रेस हा पक्ष नसून विचार आहे. देशाच्या विकासात मोलाचे योगदान काँग्रेसने दिले आहे. काँग्रेस पक्ष संघटात्मक दृष्टीने अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आपल्यावर असून सर्वांनी पक्षसंघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. यासोबतच अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.