साफसफाई करताना सापडली सुसाईट नोट
धामणगाव बढे (जि. बुलढाणा) : मोताळा तालुक्यातील लिहा येथील मामाने भाच्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याला कारणीभूत भाचा आणि ३५ वर्षीय मामीचे प्रेमसंबंध आहे. त्यांच्या प्रेमाची माहिती मामाला लागल्यानंतर हा प्रकार घडला. याबाबत तब्बल महिनाभरानंतर भाच्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीने प्रकार उघडकीस आले. रवींद्र ऊर्फ दीपक गुलाबराव चरावंडे (रा. लिहा) असे आत्महत्या करणाऱ्या भाच्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच गावात घराशेजारी राहणारा मामा आणि भाचा रवींद्र यांच्यात घरोबा होता. नेहमीच ये-जा असल्यामुळे रवींद्र आणि मामी यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. काही दिवसांनी दोघे एकमेकांना प्रेम करू लागले. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मामाला लागली. यामुळे मामाचा राग अनावर झाला. दोघांच्या प्रेमाला विरोध सुरू झाल्यानंतर मामी व रवींद्रने पळून जाण्याचे ठरवले. परंतु, नातेवाइकांनी समजूत काढत दोघांना परत आणले. मात्र, मामाला रवींद्रला मारायचे होते. यामुळे मामा रवींद्रला ‘आत्महत्या कर नाही तर मामीला मारून तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवणार’ अशी धमकी देत होता. मामाच्या धमक्यांना घाबरून रवींद्रने गळफास घेत आत्महत्या केली. रवींद्रने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी घर साफ करताना सापडल्यानंतर प्रकार उघडकीस आला.
मार्चमध्ये गेले होते पळून
रवींद्र हा अनेकदा मामीसोबत बाहेरगावी जात होता. यामुळे दोघांमध्ये जवळीक वाढली होती. मात्र, त्यांच्या नात्याबाबत कळताच मामा आणि रवींद्र यांच्यात वाद होऊ लागला. रवींद्र व मामी मार्च महिन्यात घरून पळून सुद्धा गेले होते. रवींद्र आणि मामी भुसावळला असल्याचे कळल्यानंतर नातेवाइकांनी दोघांना परत आणले. नंतर मामा सतत रवींद्रला फोन करून धमक्यादेत होता. या धमक्यांना कंटाळून ३० मार्च रोजी रवींद्रने आत्महत्या केली होती.
साफसफाई करताना सापडली सुसाईट नोट
रवींद्रच्या मृत्यूनंतर धामणगाव बढे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु, घराची साफसफाई करत असताना अचानक टीव्हीमागे रवींद्रने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात सर्व बाबी सविस्तर नमूद केल्याने एकच खळबळ निर्माण झाली. मामाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे रवींद्रने लिहिल्याचे समोर आल्यानंतर मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.