भंडारा (प्रतिनिधी) : दुचाकीने मावस बहिणीकडे मुलासह जात असताना भरधाव रेतीच्या टिप्परने चिरडले. राजू श्यामराव रहांगडाले (२६) व गीता श्यामराव रहांगडाले (५०) रा. नागपूर असे मृतकांचे नाव आहे. सदर घटना मोहदुरा-सातोना मार्गावर सोमवारी घडली.
माहितीनुसार, राजू व त्यांची आई हे गोंदिया जिल्ह्यातील परसवाडा येथे मावस बहिणीकडे लग्नाला जात होते. मोहदुरा पासून काही अंतरावर वळण मार्गावर भरधाव टिप्पर व दुचाकीची धडक झाली. टिप्परने जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. धडक एवढी भीषण होती की मागे बसलेल्या गीता रहांगडाले या रस्त्यावर कोसळल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर राजू टिप्परच्या समोरच्या चाकाखाली आल्याने दोघांचा करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. टिप्पर चालक व ट्रकला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
रेती वाहतूक सुरूच
पाच दिवसांपूर्वी भंडाराच्या एसडीओंवर रेती माफियांनी जीवघेणा हल्ला केला. यात सुदैवाने ते बालबाल बचावले. यानंतर एक ते दोन घाट वगळता सर्वंच घाटातून रेतीची अवैध वाहतूक सुरूच आहे. रेतीच्या अवैध वाहतुकीचे बळी सोमवारी मायलेक ठरले. घाटातून रेती उपसल्यानंतर शक्य तेवढ्या वेगाने वाहन पळविले जाते. वेगावर नियंत्रण नसल्याने भीषण अपघाताच्या घटना घडत आहेत. अशा घटनांनंतरही रेती माफिया आत्मचिंतन करीत नाही. लोकांचा जीव रेती माफियांसाठी स्वस्त आहे, असेच म्हणावे लागेल.