चिचाळा येथील नागरीकांची पाण्यासाठी भटकंती

अनेक दिवसापासुन पाणी पुरवठा बंद

मूल (प्रतिनिधी) : उन्हाळा लागताच पाण्यासाठी नागरीकांची लाही लाही होत असतानाही चिचाळा ग्राम पंचायत मार्फत पाणी पुरवठा काही दिवसांपासुन बंद असल्याने नागरीकांना ऐन उन्हाळयात पाण्यासाठी वणवण भटकण्याची पाळी आलेली आहे.

मूल तालुक्यातील मौजा ताडाळा येथील तलावाचे काम काही दिवसांपासुन सुरू आहे, सदर तालवाचे काम करण्यासाठी तलावातील पाणी नदीमध्ये सोडण्यात आलेले होते, यामुळे चिचाळा ग्राम पंचायत मार्फत सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या टॉकीमधुन गढुळ पाणी पुरवठा चिचाळा येथील नागरीकांना मिळत होते, याबाबत ग्रांम पंचायतने सिंचाई विभागाला पत्र देवुन समस्या मार्गी काढण्याची मागणी केली, व चिचाळा येथील पाणी पुरवठा बंद करण्यात आला, यामुळे ऐन उन्हाळयात नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

तालुक्यात चिचाळा ग्राम पंचायत ही मोठी आहे, राजकीयदृष्टया संवेदनशिल असलेल्या चिचाळा येथील नागरीकांच्या मागणीनुसार आरो प्लॅट उभारण्यात आले मात्र विज देयक न भरल्यामुळे आरो प्लॅंट काही महिण्यापासुन बंद आहे, यामुळे पाण्यासाठी नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.