बल्लारपूर विधानसभा उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार

काँग्रेस कमिटीने केले आयोजन

विसापूर (प्रतिनिधी) :  बल्लारपूर शहर काँग्रेसच्या वतीने शहरात व तालुक्यात काँग्रेसची ऑनलाईन सदस्य नोंदणी करण्यासाठी सभा आयोजित केली. सभेत सदस्य नोंदणी मोहिमेला गतिमान करण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर विधानसभा उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल युवक काँग्रेसचे राजेश नक्कावार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अब्दुल करीम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, छाया मडावी, दिलीप माकोडे, माजी काँग्रेस गट नेता देवेंद्र आर्य, महिला काँग्रेस अध्यक्ष मेघा भाले, सत्कारमूर्ती राजेश नक्कावार,नगरसेवक पवन मेश्राम, भास्कर माकोडे, नरेश मुंधडा, इस्माईल ढकवाला, कैलास धानोरकर, रवींद्र कोडापे, डेव्हीड काम्पेल्ली, अनिल खरतड, हेमंत मानकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी घनश्याम मुलचंदानी, अब्दुल करीम व दिलीप माकोडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ प्रदान करून राजेश नक्कावार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी घनश्याम मुलचंदानी म्हणाले, काँग्रेस ही विचारधारा आहे. सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. या पक्षाने जनतेचे हीत जोपसले आहे. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस सदस्य नोंदणीला प्राधान्य देऊन कार्य करण्याची जबाबदारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. राजेश नक्कावार हे पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी असून त्यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी कार्य करावे, असे सांगितले.