साडेचार कोटीपेक्षा जास्त तडजोड रकमेचा समावेश
चंद्रपूर (प्रतिनिधी) : जिल्हयात 12 मार्च रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 2480 प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली. यात 4 कोटी, 59 लक्ष, 1 हजार, 626 रुपये तडजोड रकमेचा समावेश आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण यांच्या सुचनेनुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये एकाच दिवशी घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयीन प्रलंबित 1242 आणि दाखलपूर्व 1238 असे एकूण 2480 प्रकरणे एकाच दिवशी निकाली निघाली. सदर प्रकरणांमध्ये एकूण साडेचार कोटी रुपयांहून अधिक मुल्याच्या वादाबाबत तडजोड झाली.
राष्ट्रीय लोक अदालत निमित्त आयोजित विशेष मोहिमेंतर्गत 235 प्रकरणांचा तर मुख्य न्यायदंडाधिकारी आस्थापनेद्वारा 516 प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये 23 प्रकरणांचा यशस्वी समझोता झाला. यात 15 लक्ष, 14 हजार 100 रुपये तडजोड रकमेचा समावेश आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कविता अग्रवाल, न्यायाधीश सर्वश्री विरेंद्र केदार, प्रभाकर मोडक, एस. एस. मौदेकर व के. पी. श्रीखंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रशांत काळे व मुख्य न्यायदंडाधिकारी शिवनाथ काळे यांच्यासह न्यायाधीश स्नेहा जाधव, एन.एन. बेदरकर, ए. आर. गुलाल, एम. एस. काळे, आर. व्ही. मेटे, एन. एम. पंचारीया, इ. ए. भास्कर यांनी पॅनल न्यायाधीश म्हणून यशस्वीपणे काम पाहिले. तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अतुल आळशी आणि आयोगाच्या सदस्या कल्पना जांगडे (कुटे) व किर्ती वैद्य (गाडगीळ) यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
या लोक अदालतीमध्ये नागरीक, विधिज्ञ तसेच विविध बँका, विमा कंपनी, फायनान्स कंपनी यांचे अधिकारी आणि पक्षकारांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.