हवामान विभागाने केला यलो अलर्ट जारी
मुंबई (प्रतिनिधी) : मागील 1 महिन्यापूर्वी अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले होते, आता रब्बी हंगामातील गहु, तूर, हरभरा या पिकांची काढणी सुरू आहे व बहुतांश भागात आब्यांला मोहोर आलेला असतानाच हवामान विभागाने पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यातील औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या आठ जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या भागांमध्ये सोमवारी 7 मार्च रोजी ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
रब्बी हंगामातील पिके हाताशी आलेला असताना व अनेक भागांत पिकांची काढणी अद्याप झालेली नसल्याने या पावसाच्या अंदाजामुळे बळीराजा धास्तावला आहे.
हवामान विभागाने मंगळवारी व बुधवारीदेखील या भागांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय पालघर, पुणे, ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, या भागांत तुरळक पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवसांत हे क्षेत्र तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे.