निकृष्ठ कामाला तालुका कृषी विभागाचे ‘‘संरक्षण’’

अंदाजपत्रकाला डावलुन बंधाऱ्याच्या कामाला सुरूवात

मूल (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगामात पिक घेताना पाण्याची समस्या उद्भवु नये यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातुन बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे, मात्र  बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे होत असतानाही याकामाला खुद तालुका कृषी विभागाचे “संरक्षण” असल्याचे दिसून येत आहे. सदर काम अंदाजपत्रकाला डावलुन होत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मूल तालुक्यातील मौजा आगडी येथे तालुका कृषी विभागाकडून बंधाऱ्याच्या कामाला सुरूवात केलेली आहे, सदर कामाचे अंदाजपत्रक जवळपास 12 लाखाचे बनविण्यात आले असुन जिल्हा नियोजनातुन काम पुर्ण करण्यात येणार आहे आगडी येथील कामाला सुरूवाती पासुनच निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरून व पाण्यात रवाडी टाकुन करण्यात येत आहे, कामाच्या ठिकाणी कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित राहुनही निकृष्ठ काम करणाऱ्या कंत्राटदाराला निकृष्ठ काम करण्यासाठी  संरक्षण देत असल्याचे दिसून येत असल्याने, कामाचा दर्जा खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाण्याचा भरपुर साठा शेताजवळ राहावा, शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी पाण्याची कमतरता भासु नये यासाठी शासनाने बंधाऱ्याचे काम तालुका कृषी विभागामार्फत सुरू केले, मात्र आगडी येथील बंधाऱ्याच्या कामात मोठया आकाराची रवाडीचा वापर करून बंधाऱ्याचे काम करण्यात येत आहे, खोदकाम केलेल्या ठिकाणी पाणी असतानाही त्याठिकाणी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यादेखत रवाडी टाकण्यात येत आहे, असे असतानाही कृषी विभागाचे कर्मचारी गप्प राहण्याचे कारण काय असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

कृषी पर्यवेक्षकाचे ‘‘नो कॉमेंन्टस’’
तालुका कृषी विभागामार्फत बंधाऱ्याचे काम सुरू आहे, ज्या पर्यवेक्षकाच्या देखरेखीखाली काम सुरू आहे, त्या पर्यवेक्षकानी सदर निकृष्ठ कामाबद्दल बोलण्यास नकार दिला असुन काम योग्य पध्दतीने सुरू असल्यचा दावा केला आहे.