ऑनलाईन पद्धतीनेही होणार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांना उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपुर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वाेच्च न्यायालय नवी दिल्ली, आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये ऑनलाइन पद्धतीनेसुध्दा राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन 12 मार्च 2022 रोजी करण्यात येत आहे.

ज्यांना न्यायालयात येणे शक्य नाही अशा पक्षकारांना ऑनलाइन पद्धतीने लोक अदालतीत सहभाग नोंदविता येणार आहे. राज्य विधी सेवा प्राधिकरणाने यासाठी ‘सामा’ या कंपनीची मदत घेतली आहे. ऑनलाइन पद्धतीने लोकअदालतीत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या पक्षकारांशी कंपनीचे प्रकरण व्यवस्थापक, संपर्क साधणार असून, एका लिंकद्वारे पॅनेल प्रमुख व पक्षकारांना ‘व्हर्च्युअली’ एकत्र आणणार आहेत. सुनावणीनंतर पॅनेल प्रमुखांनी दिलेला आदेश ‘व्हर्च्युअली’ पक्षकारांना पाठविला जाईल. यावर पक्षकारांच्या आधार कार्डवरील ई-सिग्नेचर घेतली जाणार आहे.

चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित दिवाणी, फौजदारी कलम 138 एन.आय.अॅक्ट ( धनादेश न वटणे), बँकांची कर्जवसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद, इलेक्ट्रिसिटी अॅक्टचे समझोता योग्य वाद तसेच न्यायालयात येण्याअगोदरची प्री-लिटिगेशन प्रकरणे, महसूल, पाणीपट्टी, विजबील आपसी समझोत्याकरिता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे स्वतः येऊन किंवा 07172-271679 या हेल्पलाईन क्रमांक, किंवा 8591903934 या कार्यालयीन मोबाईल क्रमांकावर तसेच कार्यालयातील कनिष्ठ लिपिक श्री. उराडे 9689120265, श्री. सोनकुसरे 9325318616 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.