चंद्रपूर (प्रतिनिधी): बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपीला नागपूर व भंडारा वन विभागाच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. रंगनाथ शंकर मातेरे रा. बोरगाव ता. ब्रम्हपुरी असे आरोपीचे नांव आहे.
भंडारा वनविभागातील पवनी वनपरिक्षेत्रातील सावर्ला या गावात या अवयवांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून नागपूर आणि भंडारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पथक तयार केले आणि सापळा रचून ब्रम्हपुरी तालुक्यातील बोरगांव येथील रंगनाथ मातेरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बिबट्याच्या २१ मिशा, २१ नखे आणि १२ दात जप्त केले. यात चार सुळे दातांचाही समावेश आहे.
आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमांवये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.