ट्रॅक-कारच्या अपघातात 1 ठार

3 जण जखमी : चंद्रपूरात उपचार सुरू

मूल (प्रतिनिधी) : लोखंडी मचाणचे काम आटोपून चारचाकी वाहनाने मूल कडे येत असताना ट्रॅक आणि कारच्या झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 3 जण जखमी झाल्याची घटना गोंडपिपरी-आष्टी मार्गांवरील लगाम-धनुर या वळणावर शनिवारी रात्रौ 7.30 वाजता दरम्यान घडली. यात रणजीत दुर्गे रा. चकदुगाळा त. मूल याला उपचारार्थ चंद्रपूर नेत असताना मध्ये त्याची प्राणज्योत मावळली. तर, चेतन वाळके, अमरदीप उराडे व मारोती गदेकार हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

मूल तालुक्यातील चकदुगाळा येथील रणजीत दुर्गे, बेंबाळ येथील चेतन वाळके, अमरदीप उराडे आणि मारोती गदेकार हे गडचिरोली जिल्हयातील धनुर जंगलात लोखंडी मचाणचे काम करण्यासाठी गेले होते. काम आटोपून शनिवारी सायंकाळच्या सुमारास कारने लगामकडे जात असताना धनुर लगामच्या वळणावर आलापल्ली कडुन येणाऱ्या भरधाव ट्रॅकने कारला जोरदार धडक दिली, या अपघातात चारही युवक जखमी झाल्याने त्याना आष्टी आणि अहेरी येथील रूग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूरला नेत असताना रणजीत दुर्गे रा. चकदुगाळा याची वाटेतच प्राणज्योत मावळली, तर बेंबाळ येथिल चेतन वाळके गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर कोलसिटी हॉस्टिपल मध्ये उपचार सुरू आहे. अमरदीप उराडे व मारोती गदेकार यांच्यावर चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.