तात्काळ बदली करण्याची मागणी अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
मूल (प्रतिनिधी) : गावखेड्यात गावावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाची असणारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत महत्वाची संस्था असून प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये काम करण्यासाठी शासनातर्फे एक ग्रामसेवक नियुक्त केलेला असतो व त्याच्यावर ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार करण्याची जबाबदारी असते पण तोच व्यक्ती जर गाव विकासाकडे दुर्लक्ष करीत असेल तर गावाचा विकास कसा होईल असा प्रश्न केळझरच्या नागरीकांनी उपस्थित करीत संवर्ग विकास अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.
मूल तालुक्यातील केळझर ग्रामपंचायत येथे मागील जवळपास 2 वर्षापासून ग्रामसेविका कार्यरत असून कामात कामचुकापणा, नागरिक प्रमाणपत्रा करीता गेले असता उद्या या परवा या म्हणुन परत पाठविणे, ग्रामपंचायतीला नेहमी गैरहजर राहणे, पंचायत समितीला मीटिंग असल्याचे सांगून ग्रामपंचायत मधून लवकर निघून जाणे असे प्रकार घडत असल्याने तात्काळ सदर ग्रामसेविका यांना केळझर ग्रामपंचायती मधून बदलविण्यात यावे व त्या जागेवर नवीन ग्रामसेवकांना नियुक्त करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेल्या निवेदनातून गावकऱ्यांनी दिलेला आहे.
याबाबत ग्रामसेविका गिरडकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.