तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मूल येथील सीसीसी सेंटरला भेट
मूल (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा तिसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणाचा दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्या लाभार्थ्यांचे लसीकरण तातडीने करून घ्यावे. तसेच कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्ध राहील याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. कोविड-19 तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सुविधा व तयारीबाबत तहसील कार्यालय, मूल येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, मुल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, संवर्ग विकास अधिकारी सुनिल कारडवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुमेध खोब्रागडे तथा सर्व वैद्यकीय अधीक्षक, गट शिक्षणाधिकारी, मंडळ अधिकारी, नोडल अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्या लाभार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याकरिता शिक्षकांचे आदेश काढण्याबाबत यापूर्वी आदेशित केले होते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, शिक्षकांमार्फत लसीकरण करण्याबाबत योग्य तो समन्वय साधला जात आहे का? त्यासंदर्भात शहानिशा करून आवश्यक कार्यवाही करावी. सर्व नोडल अधिका-यांनी लसीकरणाच्या अगोदरच्या दिवशी व लसीकरणाच्या दिवशी संबंधित गावांना भेटी द्याव्यात. नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करून लसीकरणाची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना दिल्या. ज्या गावात लसीकरण आहे त्या गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, ग्रामपंचायत सदस्य व संबंधित नोडल अधिकारी यांची दोन दिवसाअगोदरच व्हिसीद्वारे आढावा घ्यावा व संबंधितांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने पुढे म्हणाले, बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असलेले अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांना पत्र द्यावे व त्या संदर्भात सूचित करावे. उपविभागीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी आठवड्यातून किमान तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण केंद्राला भेटी द्याव्यात. कोविड केअर सेंटर येथे आवश्यक औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्ध राहील, याची काळजी घ्यावी. पीएसए ऑक्सीजन प्लाँटच्या कामाचा प्रगतीचा आढावा घेऊन त्यासंबंधाने काम विहित मुदतीत पूर्ण करावे, कोव्हीड नियमांचे पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी पथके कार्यान्वित करावी व दोषी व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करावी, अशा सूचना तालुका प्रशासनाला दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने यांनी तहसील कार्यालय, मुल येथे कार्यान्वित असलेल्या कोविड नियंत्रण कक्ष व न्यू मॉडेल स्कूल येथे कार्यरत कोविड केअर सेंटरला भेट देत व्यवस्थेची पाहणी केली.