महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीचं संकट

23 आणि 24 जानेवारीला पावसाचा इशारा

मुंबई : कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 23 आणि 24 जानेवारीला पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. ला निनो परिस्थिती निर्माण झाल्यानेच हवामान बदललं आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत असून हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. बदलत्या हवामानामुळे अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जागतिक स्तरावर ला निनो ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशांत महासागराचं तापमान वाढल्याचा हा परिणाम असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. गतवर्षी 15 मे रोजी तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्यानंतर मोसमी हंगामातही अतिमुसळधार पाऊस झाला होता. परतीचा पाऊसही ऑक्टोबरपर्यंत होता. पुढे नोव्हेंबर, डिसेंबर आणि नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यातही राज्यात अवकाळीची नोंद झाली होती. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता. याच बदलत्या हवामानामुळं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 23 आणि 24 जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.