मारहाणीत एकाचा मृत्यु
धुळे (प्रतिनिधी) : राज्यभरातील नगरपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले. त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाला असून या निकालात भाजपने बाजी मारत 11 जागांवर विजय मिळवला आहे.
तर शिवसेनेला 4 जागा व कॉंग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर दोन गटात झालेल्या धुमश्चक्रीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेमुळे साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गालबोट लागण्याची चिन्ह पाहायला मिळत आहे. साक्री नगरपंचायतीचे प्रभाग क्रमांक 11 चे शिवसेनेचे उमेदवार ताराबाई जगताप पराभूत झाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी मध्ये व गोटू जगताप या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी गोटू जगताप याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली. दरम्यान, भावाला वाचविण्यासाठी मोहिनी नितीन जाधव धावून आल्या.
यात भांडणात त्यांनाही मारहाण झाली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. साक्री शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.