खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांची उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मागणी
चंद्रपूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वीज पुरवठा संदर्भात आज चंद्रपूरचे खासदार सुरेश धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत मुंबई स्थित महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा जंगल आणि लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेताला पाणी देण्यासाठी दिवसा वीज मिळणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. रात्रीच्या वेळी अश्या दुर्गम भागात शेतीला पाणी देतांना शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे दिवसा ८ तास वीज देण्यासाठी तांत्रिक बाबींची चाचपणी करावी. दिवसा वीज पुरवठा करताना जर अतिरिक्त आर्थिक भार महावितरणवर पडणार असेल तर तो पडू नये यासाठी जिल्हा विकास योजनेतून तो खर्च प्राप्त करून घेणे किंवा याच पद्धतीच्या अन्य पर्यायांची चाचपणी करावी,असे निर्देश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले.
नक्षलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यातील कृषिपंपाना दिवसा ८ तास वीज पुरवठा केल्यास वीज खरेदीसाठी अतिरिक्त दीड कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याने यासाठी जिल्ह्यातील जिल्हा विकास योजनेतून निधी प्राप्त झाल्यास दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होईल, असे डॉ. राऊत यावेळी म्हणाले. या पर्यायाचे स्वागत आमदार धानोरकर यांनी केले आणि या पर्यायानुसार जिल्हा विकास योजनेतून हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.
दुर्गम भागात राहणाऱ्या ग्राहकांचा तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अश्या भागासाठी वीज दर व पुरवठा याविषयी नवीन धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर बैठकीस प्रधान ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे,महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.