वरोरा : पहिल्या पत्नीसोबत खावटीचा प्रश्न न्यायालयात सुरू आहे. समझोता न झाल्याने तिच्या मुलाने मित्राला सोबत घेऊन वडिलांवरच सिनेस्टाइल प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले.
सदर घटना वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत मार्डा गावाच्या शिवारात घडली. बापाच्या तक्रारीवरून मुलगा व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वरोरा येथील रामदेवबाबा मंदिर रोड परिसरातील रहिवासी धनराज नानाजी उमरे (५५) हे यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा कानडा येथे शिक्षक आहेत. त्यांचा विवाह झाला होता. पहिल्या पत्नीपासून एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघांमध्ये पटत नसल्याने धनराजने दुसरा विवाह केला. याबाबत पहिल्या पत्नीने न्यायालयात प्रकरण दाखल केले. त्यातून तिला धनराज उंबरे यांच्या वेतनातून आठ हजार रुपये दिले जाते.
त्यानंतरही पोटगीबाबत प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. तडजोडीसाठी पहिल्या पत्नी व मुलाने प्रयत्न केला. तडजोड अमान्य झाली. अशातच धनराज उमरे एमएच ३४ झेड ४४९८ दुचाकीने वरोरावरून कानडा येथील शाळेत जात असताना वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्डा गावाच्या शिवारात त्यांना अडविले. पेट्रोल संपले आहे पेट्रोल द्या, अशी मागणी धीरज उमरे व त्याच्या मित्रांनी केली. परंतु धनराज उमरे थांबले नाही. अखेर धनराज उमरेला थांबविण्यात त्यांना यश आले. अशातच सूरज उमरे व त्याच्या मित्राने दगड आणि चाकूने हल्ला चढविला. त्यात धनराज उमरे गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. धनराज उमरे याच्या तक्रारीवरून मुलगा सूरज व त्याच्या मित्रावर वरोरा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.