गोंडपिपरीच्‍या विकासासाठी भाजपाला एक हाती सत्‍ता सोपवा : आ. सुधीर मुनगंटीवार

  • गोंडपिपरीत जाहीर सभा संपन्‍न

गोंडपिपरी : बेईमानी करुन सरकार स्‍थापन करणा-या शिवसेना-कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी-कॉंग्रेस महाविनाश आघाडी सरकारने गेल्‍या दोन वर्षात महाराष्‍ट्राला केवळ समस्‍याच समस्‍या दिल्‍या. मी अर्थमंत्री असताना गोंडपिपरीच्‍या विकासासाठी भरीव निधी दिला. या नगर पंचायत निवडणूकीत पुर्ण बहुमतासह एक हाती सत्‍ता भाजपाला सोपवा, या शहराचा सर्वांगीण विकास करण्‍याची ग्‍वाही मी आपणास देतो, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गोंडपिपरी नगरपंचायत निवडणूकी निमित्‍त गोंडपिपरी शहरात आयोजित जाहीर सभेत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

यावेळी मंचावर भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा तालुका अध्‍यक्ष बबन निकोडे, शहर अध्‍यक्ष चेतनसिंह गौर, ज्‍येष्‍ठ नेते राजेंद्र गांधी, चंदू मारगोनवार, सुहास माडूरवार, दिपक बोनगीरवार, दिपक सातपुते, सतिश धोटे यांच्‍यासह जि.प. सदस्‍य, पंचायत समिती सदस्‍य , सर्व १७ उमेदवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, केंद्रातील नरेंद्रभाई मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील सरकारने गोरगरीबांच्‍या कल्‍याणासाठी विविध योजना अमलात आणल्‍या. म्‍हणूनच मोदी है तो मुमकीन है असे आपण म्‍हणतो मात्र राहूल गांधी है तो मुश्‍कील है अशी परिस्थिती देशात असल्‍याचा टोला त्‍यांनी हाणला. राज्‍य शासन दारुवरचा कर कमी करते पण पेट्रोल डिझेलवरचा टॅक्‍स कमी करत नाही आणि महागाई वाढल्‍याचा कांगावा हे तिन्‍ही पक्ष सातत्‍याने करतात. विकास आणि कॉंग्रेस, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस यांचे काहीही देणे घेणे नाही. गोंडपिपरी शहराचा विकास भारतीय जनता पार्टीने केला व भविष्‍यातही भारतीय जनता पार्टीच या शहराचा विकास करेल. त्‍यामुळे विकासाच्‍या बाजुने कौल देत भाजपाला बहुमतासह सत्‍ता सोपवा असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले.

यावेळी देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर आदींची भाषणे झालीत. सभेचे संचालन निलेश पुलगमकर यांनी केले. सभेला गोंडपिपरी शहरातील नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.